पुणे :- खो- खो हा अस्सल देशी खेळ आता नव्या रूपात अवतरणार असून पुण्यात होणाऱ्या अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या मौसमासाठी सहा फ्रॅंचाइजींच्या वतीने झालेल्या चाचणीतून एकूण 143 खेळाडूंची निवड करण्यात आली, अशी माहिती डाबर इंडिया समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन यांनी दिली.
भारतीय खो खो महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेला पुण्यात येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत असून सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा येत्या 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुगे बालेवाडी येथे होणार आहे. एकूण 28 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 240 खेळाडूंमधून अ, ब, क व ड अशा चार गटांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी आणि अन्य अहवालांच्या निकषावर सहा फ्रॅंचाइजींनी 143 खेळाडूंची निवड केली, असे अल्टिमेट खो खोचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेन्झिंग नियोगी यांनी सांगितले.
मुंबई खिलाडीजचे सहमालक पुनीत बालन म्हणाले, की आम्ही काही डावपेच आखले आहेत. परंतु आमचे अ, ब व क असे प्लॅन आहेत. आम्हाला काही खेळाडू खरेदी करायचे होते. परंतु आता 24 खेळाडूंचा आमचा संघ उत्तम असल्याचे माझे मत आहे. खेळ खिला देंगे या आमच्या घोषवाक्याप्रमाणेच आम्ही सर्वोत्तम कामगिरी करून अव्वल स्थान मिळवू.
थेट प्रक्षेपण व रंगतदार लढतींची मेजवानी
साखळी फेरीत दररोज दोन अशा 34 लढती होणार असून बाद फेरी प्ले ऑफ पद्धतीने रंगणार आहे. बाद फेरीत क्वालिफायर व एलिमिनेटर लढतींचा समावेश आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून रात्री 10 पर्यंत चालणार आहे. सोनी समूह या स्पर्धेचा माध्यम प्रायोजक असून हिंदी (सोनी टेन 3), इंग्रजी (सोनी टेन 1), तमिळ व तेलुगू (सोनी टेन 4) आणि सोनी लिव्ह या वाहिन्यांवरून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार आहे.