मुंबई – भारतात प्रथमच बहुचर्चित अल्टिमेट खो-खो लीग येत्या सप्टेंबर महिन्यात होणार आहे, असा निर्वाळा भारतीय खो-खो महासंघाने दिला आहे. स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचा करार सोनी क्रीडा वाहिनीशी झाल्याने खो-खोप्रेमींना दूरचित्रवाणी तसेच मोबाइलवरही सामने पाहता येणार आहेत.
भारतीय खो-खो महासंघाच्या (केकेएफआय) झालेल्या बैठकीत लीगबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दोन वर्षांपासून अल्टिमेट लीगची घोषणा होत होती मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नव्हती. यंदाची स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय व दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आयोजनामुळे ही लीग आधी डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
त्यानंतर प्रक्षेपण कराराच्या समस्येमुळे लीगसाठी फेब्रुवारी महिन्याचा मुहूर्त ठरवण्यात आला. गतवर्षी करोना साथीमुळे मार्च महिन्यापासून जवळपास सर्वच खो-खो स्पर्धा रद्द कराव्या लागल्याने, अखेर आता सप्टेंबरमध्ये या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महासंघाने तयारी केली आहे.