पुणे – अल्टिमेट खो खो लीगच्या पार्श्वभूमीवर श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथील संकुलात आज खेळल्या गेलेल्या प्रदर्शनीय लढतीत सहभागी झालेल्या खेळाडूंनी उपस्थित फ्रॅंचाइजींना पारंपरिक खो खो खेळात झालेले बदल आणि कौशल्याचे अफलातून दर्शन घडवले.
खो-खो चा हा नवा अवतार सादर करण्यासाठी आज विविध संघांमधील 60 खेळाडू मैदानात उतरले आणि त्यांनी खेळातील विविध कौशल्यांचे चित्तथरारक दर्शन घडवले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेला प्रत्येकजण भारावून गेला होता.
डाबर इंडिया समूहाचे अध्यक्ष अमित बर्मन आणि भारतीय खो खो महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेला पुण्यात येत्या 14 ऑगस्ट रोजी प्रारंभ होत असून सहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 4 सप्टेंबर रोजी खेळली जाणार आहे.
साखळी फेरीत दररोज दोन अशा 34 लढती होणार असून बाद फेरी प्ले ऑफ पद्धतीने रंगणार आहे. बाद फेरीत क्वालिफायर व एलिमिनेटर लढतींचा समावेश आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणार असून रात्री 10 पर्यंत चालणार आहे.