पुणे – अल्टिमेट खो-खो स्पर्धेत आपल्या संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलणारा मुंबई खिलाडीज संघाचा उपकर्णधार गजानन मारुती शेनगल हा या मौसमात भरात असून आपल्या संघाला विजयी पुनरागमन करण्यासाठी मोलाचा वाटा उचलण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी आपल्या आई व वडिलांना माझी कामगिरी पाहता आली नाही याचेही वाईट वाटते, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
ठाण्याच्या 24 वर्षीय गजानन याने आतापर्यंत 18 डाईव्ह पॉईंट आणि 6 टच पॉईंट्स असे तीन सामन्यांत 24 गुण मिळवले आहेत. भारतातील सर्व खो खो खेळाडूंना अल्टिमेट खो खो स्पर्धेमुळे सर्वात मोठे व्यासपीठ मिळाले असल्याचे त्याने सांगितले.
आपल्या भावना व्यक्त करताना गजानन शेनगल म्हणाला की, माझ्या आईने इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळताना मला कधीच पाहिले नव्हते. पहिल्या सामन्यापूर्वी मी प्रथम मैदानावर उतरलो, तेव्हा माझ्या आईच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून तो क्षण आम्हा दोघांसाठी किती महत्त्वाचा हे मला समजून चुकले. यावेळी माझे वडीलही या ठिकाणी मला खेळताना पाहण्यासाठी हवे होते, असा विचार माझ्या मनात आला.
मुंबई खिलाडीज संघाने आतापर्यंत एक विजय मिळवला असून दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. गुजरात जायंट्स विरुद्ध 44-69 अशा पराभवानंतर त्यांनी राजस्थान वॉरीयर्स संघावर 51-43 असा विजय मिळवला; परंतु तिसऱ्या सामन्यात त्यांना गुजरात संघाकडून पुन्हा 48-66 असा पराभव पत्करावा लागला.
चेन्नई क्विक गन्स संघाविरुद्ध पुढच्या सामन्यात आमचे डावपेच प्रत्यक्षात आणणे निर्णायक ठरेल असे सांगून गजानन म्हणाला की, दोन्ही संघांनी एक विजय मिळवताना दोन पराभव पत्करले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ सामना स्तरावर आहेत; परंतु आमच्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे आव्हानात्मक ठरेल हे निश्चित. या स्पर्धेत आज (शुक्रवार) मुंबई खिलाडीज विरुद्ध चेन्नई क्विक गन्स हा सामना रंगणार आहे.