उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये लघुसंकेसाठी गेलेल्या एक चार वर्षीय बालक नाल्यात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅम्प नं- ३ शांतीनगर या ठिकाणातील गाऊपाडा परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे.
रुद्र बबलू गुप्ता असे मृत मुलाचे नाव आहे. रुद्र रात्री ७ सुमारास लघुसंकेसाठी गेला असता, त्याचा तोल जाऊन नाल्यात पडून मृत्यू झाला आहे. बराच वेळ झाला मात्र रुद्र घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. यावेळी नाल्याच्या बाहेर रुद्रची चप्पल होती. त्यामुळे तो नाल्यात पडल्याचा संशय घरच्यांना आला. त्यानंतर लगेचच महापालिका अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.
महापालिका अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाच्या जवानांनी शोध घेत रुद्रला बाहेर काढले. व रुग्णालयात दाखल केले. मात्र, मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता.