Russia-Ukraine War : – रशियातील कुर्स्क प्रांतावर युक्रेनने केलेल्या हल्ल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेसकी यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. कुर्स्क प्रांतात युक्रेच्या सैन्याने केलेल्या आक्रमणाबद्दल आतापर्यंत युक्रेन सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. मात्र काल रात्री टिव्हीवरून केलेल्या संबोधनात झेलेन्सकी यांनी अप्रत्यक्षपणे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
गेल्या ६ दिवसांपासून कुर्स्क प्रांतात युक्रेनच्या सैन्याची जोरदार चढाई सुरू आहे. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर केलेल्या आक्रमणापासून सर्वात पहिल्यांदा युक्रेनचे असे जोरदार आक्रमण झाले आहे. युक्रेनच्या या हल्ल्यामुळे रशियाच्या या सीमाभागातील नागरिकांना मोठ्या संख्येने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो आहे. या नागरिकांसाठी कुर्स्क प्रांतात २० मोठ्या आश्रय छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
युक्रेनच्या सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी रशियाच्या सैन्याला मोठे कष्ट पडत आहेत. मात्र युक्रेनच्या सैन्याला मागे हटवण्यासाठी रशियाला आपल्या राखीव सैन्याला पाचारण करावे लागले आहे. या भागात युक्रेनचे किती सैन्य आहे आणि त्यांच्याकडे किती शस्त्रे आहेत, याचा तपशील अजून उघड होऊ शकलेला नाही. युक्रेनने अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे रशिया-युक्रेन दरम्यान वाटाघाटी करण्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मात्र युक्रेनच्या या नव्या आक्रमणातून लष्करी दृष्ट्या काहीही निष्पन्न होऊ शकणार नाही, असे रशियाचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
Bangladesh Crisis : “खोट्या बातम्या दिल्या तर…”, बांगालादेशातील हंगामी सरकारने माध्यमांना दिला इशारा
रविवारी युक्रेनच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामध्ये रशियातील २ जण ठार झाले आहेत. यादोघांमध्ये ४ वर्षांचा एक लहान मुलगा देखील आहे. रशियाने युक्रेनवर चार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ५७ शाहेद ड्रोनने हल्ला केला, असे युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले. मात्र हवाई संरक्षण प्रणालीने ५३ ड्रोन पाडल्याचा युक्रेनने दावा केला आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करण्यात आले असल्याचे किव्ह शहराच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोप्को यांनी सांगितले.
रशियाने उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे डागल्याचे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे. रशियाकडून उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे वापरली जात असल्याचे युक्रेन आणि अमेरिकेने यापूर्वीही म्हटले होते.