मॉस्को – युक्रेनने बुधवारी रशियाच्या टव्हेर भागात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले केले. रशियाच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रांच्या साठ्याला लक्ष्य करून करण्यात आलेले आक्रमक स्वरूपाचे हे हल्ले होते. हल्ल्यानंतर आग लागल्याने शहर रिकामे करावे लागले. सोशल मीडियावरील छायाचित्रांमध्ये मोठ्या आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसते आहे.
मॉस्कोच्या पश्चिमेला 380 किमी अंतरावर असलेल्या कालव्याच्या परिसरातअनेक स्फोट झाल्याचे दिसून आले. सुरूवातीला या भागात छोटा भूकंप झाल्याचे भूकंप निरिक्षण केंद्रांना वाटले. नेमके काय झाले याबाबत रशियाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेलेले नाही, मात्र रशियाच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यावर मोठा हल्ला झाला असल्याचे मानले जाते आहे.
रशियन-समर्थक ब्लॉगर युरी पोडोल्न्याका यांच्या म्हणण्यानुसार टोरोपेट्सच्या परिसरात रशियाच्या दारूगोळा डेपोवर हल्ला केला गेला आहे. स्फोटाच्या ठिकाणी पारंपरिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा असल्याची माहिती रशियन माध्यमांनीही दिली आहे.
टव्हेरचे गव्हर्नर इगोर रुडन्या यांनी सांगितले की, युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले होते. मात्र, या हल्ल्यामुळे आग लागली असून काही रहिवाशांना परिसरातून बाहेर काढण्यात येत आहे. युक्रेनच्या एसबीयू सुरक्षा सेवेतील एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले की, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियाची क्षेपणास्त्रे, मार्गदर्शित बॉम्ब आणि तोफखाना स्फोटकांचा साठा नष्ट झाला आहे. काही सोशल मीडिया व्हिडिओंमध्ये दाखवलेला हा स्फोट २००-२४० टन उच्च क्षमतेच्या स्फोटांसारखा दिसत होता.
दरम्यान, जिथे अतिशय मजबूत सुरक्षा व्यवस्था आहे तिथे ड्रोनद्वारे एवढा मोठा स्फोट कसा घडवला जाऊ शकतो असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला आहे. रशिया फक्त 11,000 लोकसंख्या असलेल्या टोरोपेट्स या 1,000 वर्ष जुन्या शहरात क्षेपणास्त्रे, दारुगोळा आणि स्फोटके साठवण्यासाठी शस्त्रागार तयार करत असल्याचे अगोदर काही बातम्यांमध्ये सांगितले गेले होते. रशियाचे तत्कालीन उप-संरक्षण मंत्री दिमित्री बुल्गाकोव्ह यांनी 2018 मध्ये सांगितले होते की ही सुविधा केवळ क्षेपणास्त्रांपासूनच नाहीत तर लहान स्वरूपाच्या अण्वस्त्र हल्ल्यांपासूनही शस्त्रास्त्रांचे संरक्षण करू शकते.
दरम्यान, रशियाच्या हवाई संरक्षण युनिट्सने आमच्या भागाला लक्ष्य करून सोडण्यात आलेले 54 ड्रोन रात्रभरात नष्ट केले आहेत असे टव्हेरचा उल्लेख न करता रशियाने म्हटले आहे. तर रशियाने रात्रभरात डागलेल्या ५२ ड्रोनपैकी 46 ड्रोन आम्ही पाडले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशियाने तीन मार्गदर्शित हवाई क्षेपणास्त्रांचाही वापर केला होता, मात्र त्यांना आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचता आले नाही असेही युक्रेनने म्हटले आहे.