मॉस्को – गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनदरम्यान युध्द सुरू आहे. युक्रेनचा बराच भूभाग रशियाने ताब्यात घेतला आहे. मात्र त्यातला काही भाग त्यांनी गेल्या दोन चार दिवसांत परतच गमावलाही आहे. असे असताना जो भाग किंवा प्रांत आपल्या ताब्यात आहेत तेथील नागरिकांचे रशियात सहभागी होण्याबाबत जनमत रशियाकडून घेण्यात आले व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा रशियाने केला आहे. विशेष म्हणजे पुतीन यांच्या 70 व्या वाढदिवसापूर्वीच याबाबतचा ठराव रशियाच्या वरिष्ठ सभागृहात मांडला जाईल असेही या सभागृहाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
युक्रेनने कालच रशियाचा हा दावा फेटाळला आहे. बंदुकीचा धाक दाखवून हे जनमत घेण्यात आले असून त्याला काहीच अर्थ नाही व एकूणच ही प्रक्रिया निरर्थक असल्याची भूमिका युक्रेनने मांडली आहे. आमच्या देशाच्या सीमा कोणी बदलू शकत नाही असेही त्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांनीही रशियाचा हा दावा आणि त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया फेटाळून लावली आहे.
मॉस्कोच्या लाल चौकात एक मोठे स्टेज उभारण्यात आले आहे. त्यावर एक भव्य व्हिडिओ स्क्रिन लावण्यात आली आहे. डोनेत्सक, लुहान्स्क, झापोरिझ्झीया, खेरसन- रशिया. असे त्या स्क्रिनवर दिसून येते आहे. याचा अर्थ हे चार युक्रेनी प्रांत आता रशियाचा भाग झाल्याचे रशियाकडून जाहीर केले जात आहे. संसदेत कायदेशीररित्याही पुढच्या तीन दिवसांत या प्रांतांच्या सामिलीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.
येत्या 7 ऑक्टोबरला रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचा वाढदिवस आहे. त्याच्या तीन दिवस अगोदरच प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे भूभाग ताब्यात घेतल्यानंतर रशियाने तेथे त्यांचे प्रशासन स्थापन केले होते. या प्रशासनांनी आम्हाला रशियात सामिल करून घ्यावे असे रशियाला अधिकृतपणे कळवले आहे. दरम्यान, मुख्य गोष्ट म्हणजे जनमताची प्रकिया अगोदरच पार पडली आहे व त्याचा प्रतिसादही मिळाला आहे. आता जे काही राहीले आहे ती केवळ औपचारिकता असल्याचे रशियाने म्हटले आहे.