मॉस्को – युक्रेनच्या युद्धाला कोणतीही कालमर्यादा असल्याचे निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी म्हटले आहे. हे युद्ध रशियाच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रशियामध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या आदल्या दिवशी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
युक्रेनमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळजीचेही त्यांनी कौतुक केले. ब्रिक्स पाश्चिमात्य विरोधी नाही तर गैर-पश्चिमी आहे, हे मोदींनी नोंदवलेले मत योग्य होते.
ब्रिक्सचे सदस्यत्व ५ वरून वाढवून त्यात आणखी ५ सदस्यांचा समावेश केला जाण्याने या संघटनेला ब्लॉक शैली सारखी संघटना समजली जाऊ नये. रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धात भारताने वाटाघाटी केल्यास आपण त्याचे स्वागतच करू, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.
रशिया-युक्रेन दरम्यानच्या संघर्षावर लवकरावत लवकर शांततामय मार्गाने, तोडगा काढला जावा. अशी अपेक्षा मोदींनी २७ ऑगस्ट रोजी पुतीन यांच्याशी फोनवरून केलेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केली होती.
युक्रेनच्या भेटीदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केल्यानंतर मोदींनी पुतीन यांच्याशी संवाद साधला होता. त्यापूर्वी जुलै महिन्यात मोदींनी रशियाचा दौरा देखीलकेला होता.
भारत, ब्राझिल आणि चीन हे देश युक्रेनच्या संघर्षाविषयी मध्यस्थी करू शकतील, असे पुतीन दिनांक ५ सप्टेंबर रोजी म्हणाले होते. रशियाला युद्धामध्ये खेचण्यासाठी त्यांनी अमेरिका आणि नाटोला दोष दिला.
युक्रेनचे सैन्य स्वतःहून अचूक मारा करू शकणाऱ्या शस्त्रांची प्रणाली हाताळू शकत नाही. ही प्रणाली नाटोचे सैनिकच हाताळू शकतील. मात्र प्रत्यक्ष्यात रशियाविरोधात नाटोच युद्ध करत आहे.
रशियन सैन्य हे जगातील सर्वात लढाऊ आणि उच्च-तंत्र सैन्यांपैकी एक बनले आहे आणि नाटो आपल्याविरुद्ध हे युद्ध करताना थकून जाईल. युद्धात आपला देश विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भारतातील चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन देण्याची इच्छा
दिनांक २२-२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी कझानला जाणार आहेत. भारत आणि रशिया व्यतिरिक्त, ब्रिक्समध्ये चीन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील देखील आहेत.
हा गट जागतिक जीडीपीच्या २४ टक्के आणि जगाच्या लोकसंख्येच्या ४१ टक्के प्रतिनिधित्व करतो आणि पश्चिमेला आर्थिक पर्याय ठरतो. इराण, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश या गटात नवीन सहभागी झालेले सदस्य आहेत.
ब्रिक्सचे दरवाजे नवीन सदस्यांसाठी बंद केलेले नाहीत आणि हा गट विकसित होताना सदस्य नसलेल्या देशांनाही आर्थिक फायदा होईल, असे पुतीन म्हणाले.
या परिषदेदरम्यान मोदींशी चर्चा होईल तेंव्हा भारतातील चित्रपट उद्योगाला अधिक प्रोत्साहन देण्याबाबतही आपण चर्चा करू असेही ते म्हणाले.