दुबई – युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात सौदी अरेबियामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्याचे संकेत दिले होते. तेंव्हापासून रशिया-युक्रेन दरम्यानच्या वाटाघाटी अमिरातीमध्येच होतील, असे मानले जात आहे.
जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेत सहभागी झाल्यानंतर झेलेन्स्की अबू धाबीला पोहोचले. रविवारी रात्री झेलेन्स्की आणि त्यांच्या पत्नीचे विमानतळावर अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले. रशियाने २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण केल्यापासून झेलेन्स्की प्रथमच युएइमध्ये आले आहेत.
रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनच्या जास्तीत जास्त सैनिकांना परत आणण्याला आमचे प्राधान्य असणार आहे, असे झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. मात्र झेलेन्स्की यांच्या दौऱ्याच्या मुख्य हेतूबद्दल युएइच्या सरकारी वृत्तसंस्थेने कोणतेही भाष्य केलेले नाही. झेलेन्स्की अबूधाबीमध्ये असण्यामागे त्यांचा अजेंडा काय असेल हे लगेच स्पष्ट झाले नाही.
अबू धाबी या आठवड्यात द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन आणि परिषद शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करत आहे, युद्धामुळे रशियावर पाश्चात्य देशांचे निर्बंध असले तरी युक्रेन आणि रशिया दोघांनीही तिथे शस्त्रे प्रदर्शित केली आहेत.
सौदी अरेबियामध्ये होणार रशिया-अमेरिका चर्चा –
युक्रेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बैठकीची तयारी यावर उच्च रशियन अधिकारी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सौदी अरेबियामध्ये चर्चा करणार आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि पुतीन यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार युरी उशाकोव्ह हे मंगळवारी होणाऱ्या चर्चेसाठी सौदी अरेबियाच्या राजधानीला जातील, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले.
रशिया आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा सर्वसामान्य करण्यावर या चर्चेचा भर असणार आहे. तसेच दोन्ही अध्यक्षांच्या चर्चेच्यावेळी युक्रेन शांतता चर्चेची पार्श्वभुमी तयार केली जाणार आहे. ट्रम्पचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ युक्रेनवरील चर्चेसाठी सौदी अरेबियाला जाणार आहेत युक्रेनमधील लढाई थांबवण्यासाठी येत्या काही दिवसांत रशियन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो सौदी अरेबियाला जाणार आहेत.