अमेरिकेने विनाकारण थांबवली अमेरिकेची मदत
क्यीव – अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राजकारणाचा युक्रेनाला मोठा फटका बसला असून अध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनची एक दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत थांबवली आहे. अमेरिकेने ही मदत का थांबवली आहे याचे कारण मला कोणीच सांगितले नाही अशी तक्रार युक्रेनच्या अध्यक्षांनी केली आहे.
ट्रम्प यांचे डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्या विरोधातील चौकशीला युक्रेनने साथ द्यावी म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनची मदत थांबवली असल्याचा अन्वयार्थ लावला जात आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमायर झेलेन्सकी यांनी अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातून कटाक्षाने दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ट्रम्प यांनी मात्र त्यांचा पिच्छा पुरवला आहे. ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना फोन करून त्यांच्यावर त्यांनी आपले प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्या चौकशीसाठी दडपण आणले होते.
त्या फोन कॉलचा तपशील जाहीर झाल्याने ट्रम्प अडचणीत आले आहेत. तथापी त्या संबंधात पत्रकारांशी बोलताना झेलेन्सकी यांनी सांगितले की, मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. माझ्यावर दबाव आणायचा प्रयत्न होतो आहे हे खरे आहे, पण मी युक्रेन या स्वतंत्र देशाचा अध्यक्ष आहे.