Russia-Ukraine war – युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियाच्या वायव्येकडील भागातल्या आणखी एका शस्त्र गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे या गोदामामध्ये भीषण स्फोट झाले असून एक महत्वाचा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला आहे.
युक्रेनने रात्रभरात सुमारे १०० ड्रोनचा मारा रशियाच्या वायव्येकडील भागात आणि रशियाने ताबा घेतलेल्या क्रिमियामध्ये केला आहे, असे रशियातल्या सरकारी वृत्तसंस्थेने आणि संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात बुधवारी याच भागातल्या आणखी एका शस्त्र गोदामालाही अशीच आग लागली होती. त्यावेळी १३ जण जखमी झाले होते. आज झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने सुमारे १०० किमोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आणि मोठमोठे स्फोट व्हायला लागल्यामुळे जवळच्या रेल्वे स्टेशनमधील प्रवाशांना तात्काळ तेथून बाहेर काढण्यात आले.
हा ड्रोन हल्ला मॉस्कोच्या वायव्येकडे ३६० किमोमीटर अंतरावरच्या तवेर भागातल्या तोरोपेत्स शहराजवळ झाला. हा भाग युक्रेनच्या सीमेपासून ५०० किलोमीटर अंतरावर आहे. ड्रोन हल्ल्यानंतर शस्त्रास्त्रांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका अन्य हल्ल्यामध्ये रशियाच्या नैऋत्येकडील क्रासनोदार भागातल्याही एका क्षेपणास्त्र आणि दारुगोळा गोदामालाहीआग लागली होती. या भागात देखील एकापाठोपाठ एक स्फोट व्हायला लागल्यावर तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
दरम्यान युक्रेनने डागलेली १०१ ड्रोन पाडण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सकाळी सांगितले. युक्रेनच्या या ड्रोन हल्ल्यामध्ये जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.