कीव – युक्रेनच्या सशस्त्र दलांनी खेरसन ओब्लास्टमध्ये दोन रशियन हेलिकॉप्टर पाडली असल्याचे वृत्त आहे, त्यावेळी दोन पैकी एक वैमानिक वाचला असून त्याला रूग्णालयात हलवण्यात आले आहे. यापूर्वी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी सांगितले की रशिया खेरसनमध्ये एक खोटे “सार्वमत” आयोजित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी 2014 मध्ये पूर्व युक्रेन आणि क्रिमीया मध्ये जे केले होते त्याचीच त्यांनी आत्ता नक्कल सुरू केली आहे.
त्यातच रशियाने तेथे विमाने पाठवून नागरीकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण त्यांची दोन विमाने पाडण्यात आली आहेत असेही युक्रेनने म्हटले आहे. आज कीव प्रदेशात महिला आणि मुलांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कराच्या ताफ्यावर रशियन लोकांनी गोळीबार केला, त्यात एका मुलासह सात जण ठार झाले.
11 मार्च रोजी महिला आणि मुलांचा एक जथ्या मंजूर कॉरिडॉर वापरून कीव ओब्लास्टमधील परेमोहा गावातून बाहेर पडत असताना त्यांच्यावरही हल्ला झाला. नागरीकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सहमतीने जे कॉरिडॉर तयार करण्यात आले आहेत तेथेही रशियाकडून हल्ले होत आहेत ही बाब दुर्देवी आहे असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.