किव्ह – रशियाने ताब्यात घेतलेले लेमान हे शहर युक्रेनच्या सैन्याने परत मिळवले आहे. लेमान शहराचा उपयोग रशियाच्या सैन्याकडून सैन्याची वाहतूक आणि उपयोगी साधनांच्या साठ्यासाठी केला जात होता. दोन दिवसांपूर्वी युक्रेनच्या सैन्याने या शहराला वेढा घातला होता. त्यामुळे रशियाचे 5 हजार सैनिक तेथे अडकून पडले होते.
युक्रेनच्या जोरदार माऱ्यामुळे रशियाच्या या सैनिकांना माघार घेणे भाग पडले आहे. रविवारी संध्याकाळी रशियाच्या सैनिकांनी माघार घेतल्यामुळे युक्रेनने आपले लेमान शहर पुन्हा मिळवले आहे. लुहान्सक प्रांताच्या सीमेजवळील दोनेत्सक प्रांतातील हे शहर पुन्हा स्वतंत्र करण्यात आल्याची माहिती झेलेन्सकी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात दिली आहे.
दरम्यान युक्रेनच्या सैन्यावर रशियाने आत्मघातकी ड्रोन हल्ल्यांचा मारा करायला सुरुवात केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांचे मूळ गाव आणि अन्य भागात ड्रोन हल्ले केले जाऊ लागले आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनने अमेरिकेकडून मिळवलेल्या हिमार्स रॉकेटचा मारा करायला सुरुवात केली आहे.
युक्रेनचे चार प्रांत रशियाने काबीज केल्यानंतर चवताळलेल्या युक्रेनच्या सैन्याने सुरू केलेला प्रतिहल्ला सोमवारीदेखील अव्याहतपणे सुरू राहिला आहे. ताब्यात घेतलेल्या चार प्रांतांव्यतिरिक्त रशियाकडून आता दक्षिणेकडील खेरसोन देखील ताब्यात मिळवण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतील, असा निरीक्षकांचा अंदाज आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहरानंतर खेरसोन हा अत्यंत अवघड युद्धभूमी असलेला भूभाग आहे. या भागावर रशियाच्या सैन्याने गेल्या महिन्यापासून चढाई करायला सुरुवात केली आहे.