न्यूयॉर्क :- युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्सकी यांना टाईम मासिकाच्यावतीने वर्षातील सर्वाधिक चर्चेतील व्यक्ती अर्थात “पर्सन ऑफ द इयर-2022′ म्हणून निवडण्यात आले आहे. बुधवारी टाईम मासिकाच्यावतीने ही निवड जाहीर करण्यात आली.
झेलेन्सकी यांना युक्रेनमध्ये आणि विदेशातूनही या वर्षी नायक म्हणून ओळखले जाते आहे. रशियाला उघड आव्हान देणारे नायक आणि लोकशाहीचे प्रतिक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाऊ लागले आहे. रशियाच्या हल्ल्यांच्याविरोधात ते अजूनही त्यांच्या देशाचे नेतृत्व करत आहेत, असे या निवडीसंदर्भातील घोषणा करण्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
धैर्य हा गुण संसर्ग पसरावा तसा पसरतो. युक्रेनच्या राजकीय नेत्यांमध्ये युद्धाच्या पहिल्या दिवसापासून हे धैर्य असेच पसरवले गेले आहे. झेलेन्सकी हे कठोर समस्येमध्ये आहेत, हे सर्वांना माहित आहे. मात्र अशा परिस्थितीत ठाम राहण्याचे त्यांचे काम विलक्षण आणि ऐतिहासिक आहे, असेही टाईमने म्हटले आहे.
#RussiaUkraineWar : इराणकडून रशिया मागवणार आणखीन ड्रोन-क्षेपणास्त्रे; अमेरिकेने व्यक्त केली चिंता
युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या केवळ 6 महिने आगोदर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ घनी तालिबानच्या आक्रमणामुळे देश सोडून पळून गेले होते. 2014 मध्ये युक्रेनचे तत्कालिन अध्यक्ष विक्टर यानुकोविच हे देखील आंदोलनामुळे रशियाला पळून गेले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला अल्बानिया, बेल्जियम, झेकोस्लोव्हाकिया, ग्रीस, पोलंड, नेदरलॅंड्स, नॉर्वे आणि युगोस्लाव्हियाचे नेते जर्मनीच्या आक्रमणाला घाबरुन पळून गेले होते. मात्र झेलेन्सकी अजूनही आक्रमणाला तोंड देत आपल्या देशवासियांसमवेत ठाम आहेत, हे टाईम मासिकाने अधोरेखित केले आहे.