लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांना झटका बसत असून ते शर्यतीत मागे पडताना दिसत आहेत. “द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश अर्थमंत्री नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पुढच्या नेत्या होण्यासाठी औपचारिक पाठिंबा दिला आहे.
नदिम झहावी यांनी लिझ ट्रस यांच्या समर्थनार्थ म्हटले आहे की, परराष्ट्र सचिव ट्रस जुन्या आर्थिक पुराणमतवादाला छेद देतील आणि आपली अर्थव्यवस्था पुराणमतवादी पद्धतीने चालवतील. ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी लिझ यांना पाठिंबा देणे ही ऋषी सुनक यांच्यासाठी चांगली बातमी नाही. मात्र, सुनक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लिझ ट्रसला तगडी टक्कर देत आहेत.
ब्रिटनचे अर्थमंत्री नदिम झहावी यांनी लिझ यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी लिझ यांना पाठिंबा दर्शवला आहे. दोनच दिवसांपूर्वी, ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनीही ट्रस यांना देशाच्या पुढील पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिला. संरक्षण सचिवांनी आपल्या निवेदनात लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले होते.
वर्णद्वेष हा घटक नाही – ऋषी सुनक
ब्रिटन पंतप्रधानाच्या निवडणुकीत मला असे वाटत नाही की लिंग किंवा वांशिकता यासारख्या घटकांना महत्त्व दिले जाईल, असे मत ऋषी सुनक यांनी “डेली टेलिग्राफ’ला एका मुलाखतीत व्यक्त केले. सुनक म्हणाले, बोरिस जॉन्सन यांच्या पुढील पक्षाचे नेते आणि उत्तराधिकारी यांना मतदान करण्याच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यत्वाच्या निर्णयामध्ये वर्णद्वेष हा घटक नाही. माझी रिचमंडमधील संसद सदस्य म्हणून निवड झाली आहे. आमच्या सदस्यांनी सर्व गोष्टींपेक्षा योग्यतेला प्राधान्य दिले आहे. मला खात्री आहे की, जेव्हा ते या प्रश्नावर विचार करत आहेत, तेव्हा ते फक्त पंतप्रधान होण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती कोण आहे हे शोधतात, असेही सुनक यांनी स्पष्ट केले.