UK Parliamentary Election । ब्रिटनमधील निवडणुकांचे निकाल काल आले, ज्यामध्ये ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत मजूर पक्षाने बाजी मारली असून 400 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. लेबर पार्टीचे केयर स्टारमर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. 2020 मध्ये जेरेमी कॉर्बिन यांच्या जागी स्टारर यांची मजूर पक्षाच्या नवीन नेत्याची निवड झाली होती. दरम्यान,या निवडणुकीत भारतीयांचा डंका पाहायला मिळाला. कारण यात भारतीय वंशाचे विक्रमी तब्बल २८ लोक खासदार म्हणून निवडून आलेत.
ब्रिटनमध्ये विजयी झालेल्या भारतीय वंशाच्या २८खासदारांपैकी विक्रमी १२ सदस्य शीख समुदायाचे आहेत. यामध्ये हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आलेल्या सहा महिलांचाही समावेश आहे. सर्व विजयी शीख खासदार मजूर पक्षाचे आहेत. यामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेले 9 खासदार आहेत, तर दोन खासदार आहेत ज्यांना जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तसेच एका शीख खासदाराला दुसऱ्यांदा हाऊस ऑफ कॉमन्सला भेट देण्याची संधी मिळाली आहे.
‘या’ जागांवर शीख खासदार विजयी UK Parliamentary Election ।
एका इंगेजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, शीख खासदार प्रीत कौर गिल आणि तनमनजीत सिंग ढेसी यांनी लेबर पार्टीच्या तिकिटावर अनुक्रमे बर्मिंगहॅम एजबॅस्टन आणि स्लोह तिसऱ्यांदा जिंकले. नॉटिंगहॅम ईस्टमधून नादिया व्हिटोमने दुसऱ्यांदा विजय मिळवला. 2019 मध्ये जेव्हा व्हिटोम पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये वयाच्या 23 व्या वर्षी सर्वात तरुण खासदार होत्या. नादिया स्वतःला कॅथोलिक शीख म्हणते.
किरीथ एंटविसल, ज्यांना किरीथ अहलुवालिया म्हणूनही ओळखले जाते, त्या बोल्टन नॉर्थ ईस्टसाठी खासदार म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या. डुडले लोकसभा मतदारसंघातून सोनिया कुमार या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे हरप्रीत कौर उप्पल याही हडर्सफील्ड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. शीख खासदारांच्या बाबतीत कॅनडा पहिल्या क्रमांकावर असून, 18 शीख खासदार आहेत, तर 12 खासदारांसह ब्रिटन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या या भारतीय वंशाच्या नेत्यांचाही विजय UK Parliamentary Election ।
ऋषी सुनक यांनी यॉर्कशायरमधील रिचमंड आणि नॉर्थलर्टन मतदारसंघात विजय मिळवला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या भारतीय वंशाच्या खासदारांपैकी ते विजयी झाले आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आणि माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन आणि प्रिती पटेल आणि सुनक यांच्या गोव्यातील मूळ कॅबिनेट सहकारी क्लेअर कौटिन्हो यांनीही आपापल्या जागा जिंकल्या. गगन मोहिंद्राने वेस्ट हर्टफोर्डशायरमधून तर शिवानी राजाने लीसेस्टर पूर्वमधून विजय मिळवला आहे.