करोनाची लस आणणारे ते दोघे…

बर्लिन- आमची करोनावरची लस 90 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त परिणामकारक असल्याचा दावा फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी केला आहे. यातील फायझर अमेरिकी कंपनी आहे, तर बायोएनटेक ही जर्मन.

मात्र येथे विषय आहे तो बायोएनटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगूर साहीन यांचा व त्यांच्या पत्नीचा. करोनाची लस तयार करणारे हे जोडपे आज जर्मनीतील सगळ्यांत श्रीमंत जोडपे आहे. मात्र त्यांचा येथपर्यंतचा प्रवास हा संघर्ष काय असतो आणि समर्पण भावनेने काम केले तर काय साध्य करता येउ शकते याचे उत्तम आणि आदर्श उदाहरण ठरावे.

उगूर साहीन यांचा जन्म तुर्कीत झाला. आज ते सीईओ असले तरी एकेकाळी ते फोर्ड कंपनीचे कर्मचारी होते. त्यांचे पिता जर्मनीत राहत असल्यामुळे ते वयाच्या चौथ्या वर्षी जर्मनीत आले. येथील विद्यापीठात त्यांनी ओैषध शास्त्राचे शिक्षण घेतले आणि आजही ते युनिव्हर्सिटी ऑफ मेन्झ येथे विद्यार्थ्यांना शिकवतात.

गेल्या 20 वर्षांपासून साहीन यांच्यासोबत काम करत असलेले प्रा. मॅथीअस थीओबाल्ड म्हणतात की, साहीन एक उदार व्यक्तीमत्व आहे. आपण असे काहीतरी करावे ज्यामुळे आपला एक दृष्टीकोन प्रस्थापित होउ शकेल अशी त्यांची कायम इच्छा असायची. त्यामुळे त्यांचे ध्येयही कायम उच्च आणि भव्यच असायचे.

साहीन यांच्या पत्नी ओझलेम टुरेसी या एक डॉक्‍टर आहेत. न्यूयॉर्क टाइम्सला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, या पेशाशिवाय अन्य कशाचा मी विचारच करू शकत नव्हते. आज बायोएनटेकमध्ये त्या साहीन यांच्यासोबत भागिदार आहेत.

खरेतर कर्करोगाच्या अँटीबॉडी तयार करण्याचे या जोडप्याचे लक्ष्य होते. त्यावरच त्यांचे काम सुरू होते. त्याकरता 2001 मध्ये एका कंपनीची स्थापनाही त्यांनी केलेली. जर्मनीच्या मेन्झ येथे स्थापन केलेल्या याच कंपनीचे नाव बायोएनटेक.

तुर्कीहून जर्मनीत आलेल्या या दोघांनी 2002 मध्ये विवाह केला. कामाच्या प्रति निष्ठा असल्या शिवाय आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला शिवाय यश मिळत नाही. दोघांचे लग्न होते त्या दिवशी साहीन आपल्या प्रयोगशाळेत काम करत होते, असे त्यांना ओळखणारे सांगतात.

करोनाची लस शोधण्यापूर्वीच बायोएनटेक नावारूपाला आली होती. मात्र आज ही कंपनी जगप्रसिध्द असून तेथे आत 1800 कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या वर्षीच मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्‌ यांनी त्यांच्या कंपनीत 55 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आणि त्यांच्याकडे अधिक लक्ष वेधले गेले.

एचआयव्ही आणि टीबीवर काम करण्यासाठी ही गुंतवणूक करण्यात आली होती. त्यांचे मुळात कर्करोगावर उपयुक्त ठरणाऱ्या औषधावर काम सुरू होते आणि अखेर त्यांनी मोर्चा वळवला तो करोनाकडे.

जर्मनीतला आज हा सगळ्यांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक. मात्र आजही त्यांचे स्वत:चे वाहन अर्थात कार नाही. ते आजही बाइकवरच आपल्या कार्यालयात येतात.

मुळात 2018 मध्ये साहीन व त्यांच्या पत्नी फ्लूवर दिल्या जाणाऱ्या लसीवर काम करत होते. फायझर ही कंपनीही त्यावरच काम करत होती. मार्च 2020 मध्ये करोना लसीवर सोबत काम करण्यात त्यांच्या सहमती झाली. फायझरचे ग्रीक अल्बर्ट बोरला आणि साहीन यांची चांगली मैत्री असून त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आज जगाने करोनाच्या संकटातून सुटकेच्या दिशेने पाउल उचलले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.