पुणे – देशातील विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्यासाठीची विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठे आणि महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात, असे “यूजीसी’ने निर्देश दिले आहेत.
करोना विषाणू संसर्गामुळे दि. 6 मार्चपासून देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था बंद आहेत.
मात्र, देशातील बाधितांचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याने येत्या काळात महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर “यूजीसी’ने विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्यासाठीची कार्यपद्धती प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, राज्यातील पारपंरिक विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय संबंधित राज्य सरकारला घ्यावा लागणार आहे.