UEFA Euro Cup 2021 | स्वित्झर्लंडला नमवून इटली बाद फेरीत

रोम – यूरो करंडक फुटबॉल स्पर्धेत अ गटात बलाढ्य इटलीने स्वित्झर्लंडला 3-0 असे पराभूत केले. स्पर्धेतील सलग दोन विजयांसह इटलीने बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे.

मिलफिल्डर मॅन्युअल लोकेटेली याने 26 व्या आणि 52 व्या मिनिटाला गोल केले. लोकेटेलीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. मात्र, त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना दोन गोल केले. त्यानंतर 89 व्या मिनिटाला सीरो इम्मोबायलने संघाचा तिसरा गोल नोंदवताना स्वित्झर्लंडवर 3-0 अशी आघाडी घेत पूर्ण दडपणाखाली ठेवले व विजय साकार केला.
इटली आणि स्वित्झर्लंड या संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. इटलीने पहिल्या सामन्यात तुर्कीला 3-0 असे पराभूत केले होते. तर, स्वित्झर्लंड व वेल्स यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता.

इटली आणि स्वित्झर्लंड संघात आतापर्यंत 58 सामने झाले असून इटलीने 29 विजय मिळवले आहेत. स्वित्झर्लंडला केवळ सात सामनेच जिंकता आले आहेत. तर, 22 सामने बरोबरीत सुटले आहेत. यूरो स्पर्धेत दोन्ही संघांनी 7 सामने खेळले असून 4 सामने इटलीने जिंकले आहेत. तर, 3 सामने बरोबरीत सुटले आहेत.

दरम्यान, अन्य सामन्यात तुर्कीचा सलग दुसरा पराभव झाला. आहे. वेल्स संघाने तुर्कीला 2-0 ने पराभूत केले. या पराभवानंतर तुर्कीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. वेल्सचा बाद फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अन्य सामन्यात फिनलॅण्डचा 1-0 असा पराभव करत रशियाने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. या विजयाससह ब गटातील गुणतालिकेत रशिया दुसऱ्या स्थानी आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.