लंडन – युरो करंडक फुटबॉल स्पर्धेचा संभाव्य विजेता मानल्या जात असलेल्या इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात युक्रेनचा तब्बल 4-0 असा पराभव केला व उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यातील विजयासह इंग्लंडने 1996 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. आतापर्यंतच्या स्पर्धेत एकही गोल न स्वीकारण्याचा विक्रम कायम राखत इंग्लंडने युक्रेनला 4-0 असे पराभूत केले.
सामन्याच्या सुरुवातीच्या चौथ्या मिनिटाला कर्णधार हॅरी केनने संघाचे खाते उघडले. पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने 1-0 ही आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या हाफमधील 46 व्या मिनिटाला इंग्लंडने आणखी एक गोल केला. हॅरी मागुइरे याने आघाडी 2-0 अशी भक्कम केली. 50 व्या मिनिटाला कर्णधार हॅरी केनने आणखी एक गोल करत आघाडी 3-0 अशी वाढवली.
डिक्लेन रेसच्या जागी बदली खेळाडू म्हणून आलेल्या जार्डन हॅंडरसन याने संघाचा चौथा गोल नोंदवला. यंदाच्या स्पर्धेत जार्डनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला. मात्र, गोल्डन बूट पटकावण्याची केनला सर्वाधिक संधी आहे.