लंडन – युरो करंडक फुटबॉल स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना देण्यात आलेली परवानगीच करोनाच्या वाढीला कारणीभूत ठरली आहे. या स्पर्धेचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगत आहेत.
मात्र, यंदाच्या स्पर्धेतील सामने ज्या 11 शहरांमध्ये खेळवले जात आहेत, त्या शहरांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आयोजकांकडून पुन्हा एकदा रिकामे मैदान ठेवत उरलेली स्पर्धा खेळवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
स्कॉटलंडमधून ही स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या जवळपास दोन हजार लोकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मैदानात प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, अनेक प्रेक्षकांनी केलेल्या चाचणीनंतर करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
1991 लोकांना करोना झाल्याचेही समोर आले आहे. ब्रिटनमध्ये बुधवारी 26 हजार 68 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. 29 जानेवारीनंतर सर्वाधिक रुग्ण सापडले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी न देण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.