#wari 2019 : तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी उद्योगनगरी सज्ज

आज होणार आगमन ः महापालिकेची तयारी पूर्ण
एच. ए. कॉलनीतही व्यवस्था
पिंपरी-एच. ए. कॉलनी येथील विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिरात बुधवारी (दि. 26) सकाळी पावणेसातच्या सुमारास संत तुकाराम महाराज पालखी न्याहरीसाठी थांबेल. त्यामुळे येथील मंदिर परिसरात सभामंडप उभारला आहे. महिला आणि पुरूषांसाठी स्वतंत्र दर्शनबारीची सोय केली आहे. महापालिकेकडून पाण्याचा टॅंकर, फिरते शौचालय आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

आरोग्य विभागाकडून स्वच्छता

महापालिका आरोग्य विभागाकडून आकुर्डीतील विठ्ठल मंदिर तसेच वारकरी मुक्कामी थांबणाऱ्या शाळा, व्यापार संकुल आदी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई केली आहे. पालखी मार्गाची गेल्या दोन दिवसांपासून साफसफाई सुरू आहे.

पिंपरी – आषाढी वारीनिमित्त देहू येथुन प्रस्थान झालेल्या संत तुकाराम महाराज पालखीचे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होणार आहे. पालखीचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. महापालिकेने आवश्‍यक पूर्वतयारी पूर्ण केली आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौकात स्वागत करण्यात येईल. त्यासाठी भक्ती-शक्ती चौकात स्वागतकक्ष उभारला आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासमवेत सहभागी होणाऱ्या 800 दिंडी प्रमुखांना नगरसेवकांच्या मानधनातून यंदा मृदुंग देण्यात येणार आहे. त्याची खरेदी करण्यात आली आहे. निगडी ते आकुर्डी येथील विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिरापर्यंतच्या पालखी मार्गाची स्वच्छता झाली आहे. तसेच आकुर्डीपासून दापोडीपर्यंतच्या पालखी मार्गाची स्वच्छता सुरू आहे. निगडी येथे पालखीचे स्वागत झाल्यानंतर पालखी आकुर्डी येथील विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिरात मुक्कामी असेल. पालखीच्या स्वागतासाठी सेंट उर्सुला शाळेजवळ भव्य प्रवेशद्वार उभारले आहे. या प्रवेशद्वारावर विठ्ठल, संत तुकाराम महाराज, वारकरी, मृदुंग आदींच्या प्रतिकृती आहेत. त्यामुळे हे प्रवेशद्वार लक्ष वेधून घेते.

आकुर्डीतील विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिराला रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र दर्शनबारीची सोय केली आहे. भाविकांना पिण्यासाठी आणि स्नानासाठी आवश्‍यक पाण्याची सोय केली आहे. वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. मंदिरामध्ये अंतर्गत भागात फुलांची आकर्षक सजावट केली आहे. पालखी ठेवण्याच्या जागी फुलांची सजावट व झालर तयार केली आहे. मंदिर परिसरात 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. मंदिराजवळ सेंट उर्सूला हायस्कूल, महानगरपालिकेची उर्दू शाळा, सरस्वती विद्यालय (आकुर्डी), संत तुकाराम व्यापार संकुल (निगडी), खंडोबा मंदीर (आकुर्डी) तसेच महापालिकेच्या व अन्य खासगी शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.