शंखनाद, जयघोष आणि प्रसाद वाटप
पिंपरी – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमांने संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण पसरले. उद्योगनगरीदेखील श्रीरामाच्या जयघोषाने राममय झाली.
शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषामाई ढोरे यांनी जुनी सांगवी येथील राममंदिरात आरती केली. तसेच भाजप नगरसेवकांनी ठिकठिकाणी आरती आणि प्रसाद वाटप केले. विश्व हिंदू परिषेदच्या वतीने चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरासमोर शंखनाद करण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. तसेच चिंचवड गावातील राम मंदिरामध्ये होम हवन व मंदिरासमोर आतषबाजी करुन आनंद व्यक्त करण्यात आला. करोना संसर्गामुळे शहरातील बहुतेक राममंदिरे बंदच आहेत. तरीदेखील भाविकांनी बाहेरुन श्रीरामाचे दर्शन घेत या ऐतिहासिक क्षणामध्ये स्वतःची भागीदारी नोंदविली.
चिंचवड येथील राम मंदिरात पूजा करण्यात आली. तसेच मंदिर विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. अनेक भाविकांनी सायंकाळी दिवाळीप्रमाणे आपल्या दरवाज्यासमोर दिवे लावले आणि रांगोळी काढत या ऐतिहासिक दिनाचे स्वागत केले.