मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरु झालेला संघर्ष सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेना कोणाची ? आमदारांच्या निलंबनाबाबत काय होणार याबाबत न्यायालयात १२ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी अंतर्गत द्वंद्वामध्ये शिवसेना फुटली असल्याचे सूचक विधान केलं आहे. पत्रकरांशी संवाद साधताना शेलार यांनी शिवसेनेतील फुटीबाबत भाष्य केलं.
आमच्यासोबत शिवसेना राहिली असती तर शिवसेनेत हे द्वंद्व झालं नसत. ते फुटले नसते असंही शेलार यावेळी म्हणाले. ही वैचारिक लढाई आहे. उठाव आहे. म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार तगला पाहिजे, राहिला पाहिजे, वाढला पाहिजे ही भूमिका का घ्यायला लागली याच आत्मचिंतन उद्धवजीनी केलं पाहिजे. असही शेलार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हंटले.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर राज्यात महविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत. या मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला देखील शेलारांनी यावेळी उत्तर दिल.