उद्धव ठाकरे भाजपला इतके का घाबरू लागलेत ? -जयंत पाटील 

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपच्या अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरात वारी करणार आहेत. या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेनेसारख्या पक्षाच्या प्रमुखांवर अशी परिस्थिती येईल, असे वाटले नव्हते. उद्धव ठाकरे यांच्यावर इतकी नामुष्की का ओढवली आहे? उद्धव ठाकरे भाजपाला इतके का घाबरू लागले आहेत, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, याच अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांनी अफजलखानाची फौज म्हणून हिणवले होते. आता त्याच अफजलखानाचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः गुजरातला जात आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर युती तर झालीच नसती, अशी लाचारीही त्यांनी केली नसती.

किरीट सोमय्या यांच्या उमेदवारी नाट्यावरूनही पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेना सोमय्या यांना उमेदवारी मिळू देणार आहे. शिवसैनिकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम शिवसेनेचे नेते करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.