धाराशिव, सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या सात जाहीर सभा

सोलापूर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवार, दि. 14 ऑक्‍टोबर रोजी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एकाच दिवसात उद्धव ठाकरे यांच्या एकूण सात जाहीर सभा होणार असल्याची माहिती सेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी सकाळी 9 वाजता पक्षप्रमुख ठाकरे यांचे विमानाने मुंबईहून सोलापूर विमानतळावर आगमन होईल. येथून ते वाहनाने धाराशिव येथील सभास्थळी जातील. तेथे साडेदहा वाजता ठाकरे सभेला संबोधित करतील. त्यानंतर उद्धव ठाकरे परांडा येथे पोहोचतील. तेथील आठवडा बाजार मैदानावर दुपारी सव्वा बारा वाजता त्यांची जाहीर सभा होईल.

त्यानंतर दुपारी पावणे दोन वाजता बार्शी येथील जुना गांधी पुतळा येथे, तर करमाळा येथे दुपारी साडेतीन वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सांगोला येथे मार्केट यार्डात दुपारी साडेचार वाजता आणि मोहोळ येथे सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा घेणार आहेत. रात्री साडेआठ वाजता सोलापुरातील अक्कलकोट नाका येथील पुंजाल मैदानावर उद्धव ठाकरे यांची शेवटची जाहीर सभा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)