मुंबई – काल उशिरा रात्री निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय दिला. ज्यानुसार मुंबईतील आगामी पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला तसेच या पोटनिवडणुकीमध्ये कोणत्याही गटाला शिवसेना हे नाव वापरता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट टाकत सध्याच्या घडामोडींवर मार्मिक भाष्य केलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दोन्हीही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु केल्या. ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट करत चिन्हाबाबतचा सूतोवाच केला. नार्वेकर यांनी ज्वलंत वाघाचा फोटो आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
‘जिंकून दाखवणारच’ अशा कॅप्शन खाली उद्धव ठाकरेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा आपला जुना फोटो शेअर केला आहे. दोन्हीही गटाला उद्या म्हणजेच सोमवारी चिन्हासाठीचे ३ पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर करायचे आहेत. म्हणूनच आज उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळच्या सहकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
View this post on Instagram