चाकणला आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

आमदार गोरे : महायुतीवर झालेल्या टीकेला काय उत्तर देणार?

चाकण – यंदाच्या निवडणुकीत चाकण शहरात शिवसेनेची जाहीरसभा होणार का? शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयावर शिक्‍कमोर्तब करणारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही परंपरागत सभा होणार का? अशा अनेक चर्चांना उधाण आले असताना या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. गुरुवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता चाकणच्या आंबेठाण चौकाजवळ उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.

शिवसेनाप्रमुख यांच्या 2004 मध्ये रेकॉर्डब्रेक सभेने आढळराव पाटील यांचा विजय निश्‍चित केला होता. भुतो न भविष्यती अशा या सभेने तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बदलून टाकला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हीच परंपरा कायम राखल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने जणू धसकाच घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत चाकणमध्ये शिवसेनेची सभा होऊ नये यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. कपटनीतीचा वापर करुन बाजार समितीचे आवार आरक्षित करुन तेथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा सायं 5 वाजता घेणार असल्याचे सांगितले. मात्र, निवडणूक एक खिडकी योजनेत शिवसेनेने सर्वप्रथम सभेच्या परवानगीसाठी अर्ज सादर करून आपला दावा मजबूत केल्याने राष्ट्रवादीचा डाव उधळला गेला. त्यातून शहाणपण न शिकलेल्या राष्ट्रवादीने अधिकाऱ्यांवर दडपण आणत दोन्हा सभा रद्द करण्याचा डाव घातला होता. परंतु पोलीस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांनी दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन नियमाच्या आधारे तोडगा काढून शिवसेनेच्या सभेच्या वेळेत थोडा बदल करीत परवानगी देण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्यांचा हा डाव सपशेल उधळला असून आता ठरल्यानुसार शिवसेनेची सभा चाकण येथेच होणार असून विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय निश्‍चित होणार आहे, असे आमदार गोरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

बुधवारच्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून गेल्या काही दिवसांत महायुतीवर झालेल्या टीकेला काय उत्तर देणार याचीच चर्चा होत असल्याचे दिसते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर सायं. 7 वाजता होणारी शरद पवार यांची पूर्वनियोजित सभा रद्द करुन राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणातून सपशेल पळ काढला असल्याची टीकाही आमदार गोरे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.