मुंबई – सध्या कोरोनासारख्या महाभयानक विषाणूने संपूर्ण भारतात हैदोस घातला असून, महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पुढे हे मोठे आव्हान असल्याचं दिसून येत आहे. या धोकादायक विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या कि, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका करणार नाही. तसं वाटलं तर सूचना करेल. तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच मुख्यमंत्री कुणीही असलं तरी त्याच्यावर आपला अधिकार असतो. त्यामुळे मला वाटत आतापर्यंत एक चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी लोकांच्या मनात वेगळं व्यक्तिमत्व असतं. म्हणजे ती व्यक्ती अमूक असावी. त्याने ठराविक कपडे परिधान करावेत. विशिष्ट पद्धतीचं व्यक्तिमत्व असावं. पण, या सगळ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहेत, त्यांचा पेहराव किंवा सोशल मीडियावर स्वतः अॅक्टिव्ह नाहीत, असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.
तर सीएमओ (मुख्यमंत्री कार्यालय) अॅक्टिव्ह आहेत. हे थोडसं वेगळं दिसत, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री स्वतः सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह होते. ते स्वतः ट्विट करायचे. त्यांचा सोशल मीडिया फार स्ट्राँग होता. उद्धव ठाकरे यांचा कल वेगळ्या पद्धतीनं दिसतो आहे. त्यामुळे मला वाटत नवीन असा पायंडा ते पाडू शकतात. आजच्या परिस्थिती माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.