मुंबई : शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. मात्र आता याच विषयावरुन भाजपा नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
मुंबईमध्ये सोमय्या यांनी लोकायुक्तांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाची माहिती देण्यासाठी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. परिवहनमंत्री अनिल परब यांचे कार्यालय तोडण्याचे आदेश देण्यात आले असून लोकायुक्तांसमोर न्यायालयामध्ये ठाकरे सरकारनेच परब याच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांना शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सोमय्या यांनी या सर्व घोषणा राज्यातील घडामोडींवरुन लक्ष्य विचलीत करण्यासाठी केल्या जात असल्याचा दावा केला. यापूर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवताना शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होण्याबरोबरच काही उमेदवारांना १०० मतंही पडली नव्हती असा टोला सोमय्या यांनी लगावला. तसेच पुढे हसत त्यांनी, “उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा,” असेही म्हटले.
शिवसेनेच्या उत्तर प्रदेशमधील नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भातील माहिती देणारं पत्रक जारी करतानाच या पत्रकामधून शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकावर टीका केलीय. राज्यामध्ये शिक्षण, रोजगार, कायदा सुव्यवस्था यासारखे प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या भाजपाच्या कार्यकाळात निर्माण झाल्याचे सांगतानाच भाजपाला धडा शिकवण्यासाठी सर्वच्या सर्व मतदारसंघांमधून शिवसेना उमेदवार देणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.