आघाडी सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावं ही सर्वांची इच्छा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली भूमिका

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत सरकार बनवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यातच आता राज्यात पुढील पाच वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. या निर्णयावर तिन्ही प्रमुख पक्षांची चर्चा झाली असून त्यांनी सहमतीही दर्शवली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी राज्यातील जनतेची आणि लाखो शिवसैनिकांची इच्छा आहे. ते राज्यातील जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन त्याला मान देतील असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहे हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा निर्णय शिवसेनेने स्वाभिमानाने घेतलेला आहे तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेला आहे. लवकरच महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होईल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील चित्र स्पष्ट होईल. आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली.

राज्यात सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ती लवकरच पूर्ण केली जाईल. महाराष्ट्राची सत्ता ही दिल्ली चालवू शकणार नाही. राज्याला आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आहे. परंतु आघाडी सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावं, अशी सर्वांची इच्छा आहे आणि ते सर्वांच्या भावनांना मान देतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

सत्तास्थापनेपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गुरूवारी रात्री उशीरा बैठक झाली. यामध्ये महाविकासआघाडी बाबात निर्णय जवळपास निश्‍चित झाल्याचं म्हटलं जात आहे. आज होणाऱ्या नियोजित बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत काय घडलं याबाबत माहिती मिळाली नसली तरी ही बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत राऊत यांनी दिले. जाताना त्यांनी थम्प्स अप करून दाखवत याबाबत संकेत दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)