मुंबई : शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा ‘चलो अयोध्या’चे नारे घुमू लागले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या शतकपूर्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेणार घेणार आहेत. त्यासाठी येत्या 7 मार्च रोजी उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-याची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राउत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच केली होती. अयोध्येला राहुल गांधी यांना सोबत घेउन जा अशी टीका भाजपाने केली होती.
त्याला उत्तर देताना संजय राउत यांनी स्पष्ट केले, रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. त्याचे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांनी स्वागतच केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील आमच्या मित्रपक्षाच्या नेत्यांना देखील अयोध्येला सोबत येण्याचे आवाहन आम्ही करणार आहोत.
अयोध्या यात्रा हा काही राजकीय प्रश्न नाही. जशी पंढरपूरची वारी असते तशीच ही वारी आहे. पंढरपूरच्या वारीत राजकारण, जात-पात काहीच नसते तशा प्रकारचीच ही अयोध्येची वारी असल्याचे राउत म्हणाले. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याचं कोणीही राजकारण करू नये. राजकीय दृष्टीनं याकडे पाहू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर रामजन्मभूमी प्रकरणाचा निकालही लागला. महाराष्ट्र विकासआघाडी सरकारच्या शंभरदिवसपुर्ती निमित्त उद्धव ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. आता 7 मार्च ही तारीख संजय राउत यांनी जाहीर केली आहे. या अयोध्या दौऱ्याच्या वेळी देशभरातून हजारो शिवसैनिक येणार आहेत.