Uddhav Thackeray । महाविकास आघाडीने राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ २ ४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र हायकोर्टाकडून या बंदची परवानगी नाकारण्यात आली. मुंबई हायकोर्टात वकील गुणरत्न सदावर्तेसह इतरांनी बंदविरोधात याचिका दाखल केली होती.
यावर २ ३ ऑगस्टला सुनावणी पार पडली. या सुनावणीत हायकोर्टाकडून महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारण्यात आली. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर कोणी तशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहे.
यानंतर राज्यातील ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बंद मागे घेत असल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी याचिका दाखल करणाऱ्या सदाव्रतेंवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे
याचिका दाखल करणाऱ्यांनी खरं तर कोर्टात जायलाच नको होते. ज्यावेळी माता भगिनींचा विषय येतो त्यांच्यावेळी सर्वांनीच संवेदनशीलता दाखवायला हवी. उदयाला जर राज्यातील कुठल्याही महिलांवर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि कोर्ट घेणार आहे का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत ते पुढे म्हणाले,’ त्यांचे काही लोक ”सदा’आवडते” आहे. ते नेहमीच कोर्टात जातात आणि निर्णय घेऊन येतात. मागे मराठा आरक्षणाच्यावेळीही ते कोर्टात गेले होते. असेही ते म्हणाले.
दरम्यान, अॅड गुणरत्न सदावर्ते न्यायालयात युक्तीवादादरम्यान म्हणाले होते की, ‘पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. दोषी पोलिसांवर सरकारनं कारवाई केली आहे. राज्य सरकारनं SIT स्थापन केली आहे. मग हा बंद कशाला? बदलापूर स्थानकावर झालेल्या दगडफेक घटनेचे, फोटो सदावर्ते यांनी हायकोर्टात सादर केले. अश्या प्रकारच्या दगडफेकीचे समर्थन कसं करणार? असा सवाल सदावर्तेंनी केला होता.