“ईडी”चे शुल्ककाष्ट ! उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये खलबतं; वर्षा बंगल्यावर अर्धा तास चर्चा

मुंबई – राज्यातील मुंबई, पुण्यासह अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांच्या मागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे.

या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत या दोन्ही विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्‍तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे.

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आता केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात रस्त्यावर उतरून विरोध करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांना केले आहे. भाजप दबावाचे राजकारण करत आहे.

भाजपचे नेते रोज महाविकास आघाडीतील कोणत्या ना कोणत्या नेत्यावर आरोप करत आहेत. मी एकट्याने त्यांना उत्तर देण्यापेक्षा इतरांनीही बोलले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले होते. याशिवाय राऊत यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.