सरकार पाडून दाखवाच : ठाकरे

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवाच, असे आव्हान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाला दिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जळगाव येथील शेतकरी मेळाव्यात ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडी सरकार हे त्यांच्या ओझ्यानेच पडेल, असे भाजपा नेते वारंवार म्हणत आहे. त्यावर त्यांनी शारसंधान केले.

कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पायउतार करण्यासाठी “ऑपरेशन कमळ’ राबवण्याची तयारी भाजपाने केली आहे. मात्र मतदारांनी त्यांना सत्तेच्या बाहेर फेकले आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यांनी राज्यातील सरकार पाडून दाखवावावेच, असे खुले आव्हान मी त्यांना देत आहे. जनता नव्या सरकारच्या कामगिरीवर खूष आहे, असे ते म्हणाले. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी हे सरकार काटीबध्द आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी आणि जनकल्याणासाठी आम्ही वचनबध्द आहोत, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या कर्तृत्वाने पडेल, या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, आघाडी सरकार हे घट्ट पायावर उभे आहे. शिवसेना काही सत्तेची भूकेली नाही. पण आता आम्ही सरकारमध्ये चालकाच्या जागेवर आहोत. आमच्यासोबत 25 वर्ष युती करूनही ज्यांना माझ्या नेतृत्वावर विशवास नव्हता त्यांची ही पोटदूखी आहे. मात्र सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा आमच्या नव्या सहकाऱ्यांनी माझ्यावर ताबडतोब हा विश्‍वास दाखवला, असा टोला त्यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहीणी खडसे यांना पराभूत करून मुक्ताईनगर मतदारांनी भाजपामुक्त केला आहे. चंद्रकांत निंबा पाटील यांनी विजयी होताच शिवसेनेला पाठींबा जाहीर केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपवल्याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने ठाकरे म्हणाले, भाजपाने आमच्या मतभेदाची चिंता करु नये. आमचं सारं काही सुरळीत सुरु आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.