Uddhav Thackeray on Fadnavis । लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला. या दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या विविध शाखांना भेटी दिल्या. यावेळी विक्रोळीतल्या सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘फडतूणवीस’ असा करत भाजपवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना आधीही उद्धव ठाकरेंनी फडतूस असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख ‘फडतूणवीस’ असा केला.
गद्दारांच्या पालख्या किती काळ वाहायच्या? Uddhav Thackeray on Fadnavis ।
“ठाणे, कल्याण पालघर या ठिकाणी आपल्या प्रचाराची सभा नाही तर विजयी सभा पार पडली आहे असंच मी म्हणतो. आता केवळ मी तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे. एका जिद्दीने ईशान्य मुंबईची जागा आपण मागून घेतली आहे. गद्दारांच्या आणि हरामखोरांच्या पालख्या किती काळ वाहायच्या? आजपर्यंत तुम्हाला पालखीत बसवून मिरवलं. ज्यांना पालखीत बसवलं त्यांनी शिवसेनेशी घात केला. शिवसेना संपवायला निघाले, त्यामुळेच त्यांना (भाजपा) राजकारणात संपवावंच लागेल.” अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
“तुम्ही भाजपा किंवा ‘फडतूणवीस’चे नोकर नाहीत” Uddhav Thackeray on Fadnavis ।
पुढे बोलताना त्यांनी, “मला आत्ता उमेदवार सांगत होते की शिवसैनिकांनी जी धाड टाकली त्यात महिला आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि पोलिसांनी मारहाण केली. मला त्या पोलिसांची नावं हवी आहेत. बघतो मी त्यांचं काय करायचं. पोलिसांनाही सांगतो आहे की तुम्ही भाजपा किंवा फडण.. फडणतूणवीसचे नोकर नाहीत. तुम्ही जनतेचे सेवक आणि मित्र आहात. हे सरकार जातं आहे, आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हे ठरवल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा मी पोलिसांना देतो आहे. माझा जाहीर इशारा आहे, कुणीही असूदेत. लोकशाहीसमोर तुमची मस्ती आम्ही खपवून घेणार नाही. ज्या ज्या नेभळट पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला आहे त्या हातांचं काय करायचं ते सरकार आल्यावर मी बघून घेतो.” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.