शिवसैनिकांची मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी
मुंबई : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असे संजय राऊत वारंवार सांगत आहेत. आतापर्यंत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह शिवसैनिकांकडून धरला जात होता. आता शिवसैनिकांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. मातोश्री परिसरामध्ये पोस्टरबाजी करुन शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदावर विराजमान करण्याचा जोर धरला आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे. असा मजकूर या पोस्टवर लिहिण्यात आला आहे. शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. मात्र शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवडलेले गेलेले एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते. आता तर थेट उद्धव ठाकरेंचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतले जात आहे.