नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट घेतली. महाराष्ट्रातील सत्तापालट झाल्यानंतर ठाकरे यांनी प्रथमच दिल्लीत जाऊन मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्धव ठाकरे शुक्रवारी संध्याकाळी दाखल झाले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेना एनडीएत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही डीजी परिषदेच्या निमित्ताने उभयतांची पुण्यात विमानतळावर भेट झाली होती.