मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष रंगला असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. अशातच आज गोरेगाव येथे आज उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांचा एक मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांचा सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.
संजय राऊत लढतोय
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची विशेष आठवण काढली. मंचावर संजय राऊत यांची खुर्ची रिकामी दिसतेय याचा अर्थ असा नाही की ते शिंदे गटात गेले आहेत. संजय राऊत यांनी आमच्यासोबत लढण्याचा निर्णय घेतला असून ते तलवार घेऊन आमच्या खांद्याला खांदा लावून लढतायेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित शहा यांच्यावर हल्लाबोल
अमित शहा यांच्या गणेशोस्तवात झालेल्या मुंबई दौऱ्यावरही उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला. निजामशाही, आदिलशाही प्रमाणेच अमित शाही असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. मुंबईत येऊन शिवसेनेला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्या अमित शहा यांना आम्ही आस्मान दाखवू असं उद्धव ठाकरे म्हणाले.
चला मी तुमच्यासोबत येतो
वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला धारेवर धरले. शिंदे गट केवळ होय रे महाराजाची भूमिका घेत असून केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवून नेतोय असा आरोप त्यांनी केला. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मी तुमच्यासोबत येण्यास मी तयार आहे असेही ठाकरे म्हणाले.