यादीत शरद पवार यांचाही समावेश
मुंबई : आमदार नसताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आठवे नेते ठरले आहेत. त्या यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
मोठ्या राजकीय उलथापालथींनंतर महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव यांनी शपथ घेतली. मात्र, ते विधानसभा किंवा विधान परिषद या विधिमंडळाच्या दोन्हीपैकी कुठल्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. आता त्यांना सहा महिन्यांत दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणजेच आमदार बनावे लागेल. याआधी कॉंग्रेसच्या सात नेत्यांनी आमदार नसताना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
ती घडामोड माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्याबाबतीत सर्वप्रथम 1980 मध्ये घडली. त्यानंतर 1983 मध्ये वसंतदादा पाटील यांनी आमदार नसताना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवाजीराव निलंगेकर-पाटील (1985) आणि शंकरराव चव्हाण (1986) हे आमदार नसताना सुत्रे स्वीकारणारे पुढील मुख्यमंत्री ठरले. मुंबईतील दंगलींनंतर मार्च 1993 मध्ये सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या आणि केंद्रात संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पवार यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार नसताना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री बनल्यानंतर अंतुले, निलंगेकर-पाटील आणि शिंदे विधानसभेवर निवडून गेले. तर इतर चार नेत्यांनी विधान परिषद सदस्य बनण्याला पसंती दिली. आता उद्धव कुठल्या सभागृहाचे सदस्य बनणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.