Uddhav Thackeray : महायुती सरकारने मुंबईत पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनावर घातलेल्या बंदीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी गंगेत डुबकी मारली, पण महायुती सरकार आणि मुंबई महानगरपालिका मुंबईत माघी गणपतींचे विसर्जन होऊ देत नाहीत, हे कोणते हिंदुत्व आहे?, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले की, लाखो-करोडो लोक कुंभात डुबकी मारून येत आहेत. ज्याला वाटते तिकडे जाऊन डुबक्या माराव्यात आणि पवित्र व्हावे. माघी गणेशोत्सवात ज्यांनी पीओपीच्या मूर्ती स्थापन केल्या होत्या त्यांचं विसर्जन करायचं नाही अशी त्यांना नोटीस आली आहे. हा काय प्रकार आहे? हे कोणते हिंदुत्व आहे?
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन करायचे नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होत असेल तर शाडूच्या मूर्ती बनवा हे योग्य आहे मी समजू शकतो. पण शाडूची माती देणार कोण? मूर्ती तयार झाली असेल तर पर्याय काय? विसर्जनाच्या आदल्या दिवशी नोटिसा देणार असाल तर तुमचं हिंदुत्व तरी काय आहे?, अशा शब्दात त्यांनी त्यांनी पंतप्रधान मोदी व महायुती सरकारवर निशाणा साधला.