सहकुटुंब नवनिर्वाचित खासदारांच्यासमवेत फेडला नवस
कोल्हापूर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह केंद्रीयमंत्री अरविंद सावंत आणि नवोदीत 18 खासदारांसह करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेउन नवस फेडले. यावेळी अंबाबाई मंदिरात नवोदीत खासदारांसह आमदार शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळो, अशी प्रार्थना केली. यावेळी अंबाबाई मंदिरात उत्साहाचे वातावरण होते.
उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे दुपारी पावणे एक दरम्यान मंदिरात आगमन झाले. तत्पूर्वी नवोदीत खासदारांचे गरुड मंडपात आगमन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे कुटुंबीयांसह नवोदीत खासदारांची भेट घेउन स्वागत केले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे उध्दव ठाकरे, नवोदीत खासदारांचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार गजानन किर्तीकर, ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव, राजन विचारे, विनायक राउत, धैर्यशील माने, प्रा. संजय मंडलिक यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबत अंबाबाईचे दर्शन घेतले. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे यांनी मातृलिंगाचे दर्शन घेतले.