उदयनराजे आक्रमक : सातारकरांना टोलमाफी मिळालीच पाहिजे

मुदत संपलेले टोलनाकेही बंद करण्याची मागणी

सातारा – आनेवाडी असो वा तासवडे टोलनाका असो सातारकरांना गेल्या अनेक वर्षांपासून त्रास सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते वर टोलवसुली आणि त्यात फास्टॅगमुळे वैतागलेल्या सातारकरांना टोलमधून माफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. टोलमधून माफी पुणेकरांना मिळते तर सातारकरांना का नाही, असा सवाल करत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राज्यातील मुदत संपलेले टोलनाके बंदच करा, अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना टोलनाक्यांच्या प्रश्‍नांवर छेडले असता त्यांनी टोलनाक्यांच्या बेशिस्त कारभारावर संताप व्यक्त करतानाच ठेकेदाराला देखील सुनावले. जिल्हा प्रशासन काय झोपा काढतेय काय असाही सवाल खा. उदयनराजेंनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून फास्टॅगवरून वाहनधारकांना टोलनाक्यांवर प्रचंड त्रास होत आहे.

टोलनाक्यावरून मला नेहमी टार्गेट केले जाते, मात्र टोल चालवणारा काही माझा मेव्हणा नाही. जनतेला चांगले रस्ते, चांगली व फास्ट सेवा मिळालीच पाहिजे ही माझी भूमिका आहे. पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यावर पुणेकरांना टोलमधून माफी देता तर सातारा जिल्ह्यातील जनतेलाही दिली गेली पाहिजे, यासाठी आपण केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन दिले आहे.

पुणे ते मुंबई एक्स्प्रेस वे होवून कित्येक वर्षे उलटली आहेत. ज्या ठेकेदार कंपनीने हे काम केले असेल त्यांचे पैसे कधीच फिटले आहेत. मात्र एवढी वर्षे होवून देखील एक्स्प्रेस वे वर टोल सुरूच आहे. एवढेच नाही तर राज्यातील अनेक टोलनाके गेली कित्येक वर्षे टोलवसुली करत आहेत. त्यांची मुदत संपलेली आहे. शासनाने हे टोलनाके बंद करून राज्यातील जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशीही मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली.

पुणे-सोलापूर हायवे किती सुंदर झालाय. पण सातारा ते पुणे महामार्गाची दुर्दशा झाली. वरून टोलवसुली सुरूच आहे. मग ठेकेदार कंपनीवर अ‍ॅक्शन घेतली पाहिजे ना. जुन्या टोलनाक्यांची वसुली थांबली पाहिजे. मुदत संपलेले टोलनाके बंद करा. याची जबाबदारी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी व जिल्हा प्रशासनावर आहे. मग त्यांनी कारवाई करायला नको का. चांगले रस्ते रस्ते हा जनतेचा हक्क आहे. तो मिळत नसेल ठेकेदारावर कारवाई करा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.