सातारा – खा. उदयनराजे भोसले यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची नवी दिल्लीत बुधवारी भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली. उदयनराजेंनी काल (दि. 2) केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन साताऱ्यातील नियोजित शासकीय मेडिकल कॉलेजबाबत प्रस्ताव दिला होता.
जिल्ह्यातील विकासकामांसाठी खा. उदयनराजे सध्या केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत. सातारच्या दृष्टीने महत्त्वाच्या ग्रेड सेपरेटरेचे कामही उदयनराजेंच्या संकल्पनेतून नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळत आहे. सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प सुरू करण्याचे निवेदन त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दिले. रेल्वेच्या विविध प्रश्नांवर गोयल यांच्याशी चर्चा केली. उदयनराजेंच्या मागण्यांना गोयल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्वासनही गोयल यांनी दिले.
उदयनराजेंनी केलेल्या मागण्या
प्रशासकीय मंजुरी मिळालेला सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सातारा रेल्वेस्टेशनचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण तात्काळ करावे. जिल्ह्यातील महागाव येथे रेल्वेची 50 एकर मोकळी जमीन आहे. या जमिनीवर रेल्वेने सौरऊर्जा प्रकल्प उभारावा.