सातारा – जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर, पाचगणी व जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार 35 ते 40 लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. या पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी कास पठार परिसरात छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात केंद्राच्या विमान उड्डाण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.
उदयनराजे भोसले यांनी जलमंदिरातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकादिलेल्या माहितीनुसार कास पठार येथे छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी चर्चेनंतर दिली आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक आणि पर्यटनाचा वारसा लाभला आहे. पर्यटनामध्ये गतिमानता आणण्यासाठी कास पठार परिसरात योग्य जागा शोधून तेथे एक छोटी हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती.
याची लवकरच तज्ज्ञांच्या पथकाद्वारे पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आहे. उदयनराजे भोसले आणि शिंदे यांची आज दिल्लीत भेट झाली. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी रस्ते वाहतुकीचा उपयोग होतो. मात्र, त्याला हवाई वाहतुकीची जोड दिली तर भेट देणाऱ्या व्यक्तींचा वेळ वाचणार असून पर्यटक अधिक आकर्षित होणार आहेत.
जिल्ह्याचा औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक वेगळा दर्जा आहे. या दृष्टिकोनातून कास पठार येथे हवाई पट्टी उभारण्यासंदर्भात मागणी करण्यात आल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. कोयना, उरमोडी, धोम बलकवडी अशा धरणांमध्ये सी प्लेन धावपट्टी उभारता येईल का, याचीसुद्धा चाचणी होणे गरजेचे आहे, अशी विविध प्रश्नांवर शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.