खासदार उदयनराजेंनी पुन्हा कॉलर उडवली

टीका करणाऱ्यांकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा टोला

सातारा – साताऱ्यात सोनगाव पासून ते सदर बझार पर्यंत विकास कामांचे अनेक नारळ फोडत शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा आपली कॉलर उडविली . प्रत्येकाची कामाची स्टाईल असते स्टाईल ही स्टाईल आहे आणि आपली विकास कामे करण्याची स्टाईल आहे असे उदयनराजे यांनी सांगत दिवसभर सातारा शहरात आपली भिरकिट ठेवली. टीका करणाऱ्यांकडे मी अजिबात लक्ष देत नाही काही जण नुसतचं बोलतात पण त्यांच्या बोलण्याने मला काहीच फरक पडत नाही असे उदयनराजे यांनी सांगत अप्रत्यक्षरित्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना टोला लगावला.

सदर बझार येथील पुण्यशील राजमाता सुमित्रा राजे भोसले उद्यानाच्या नूतनीकरणाचे उदघाटन तसेच सोनगाव डेपो येथील घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन सुविधांचे भूमीपूजन तसेच सदाशिव पेठेतील नवीन क्रीडांगण सुविधांचा शुभारंभ अशा विविध विकास कामांचा नारळ खासदार उदयनराजे यांनी फोडला. यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के ऍड दत्ता बनकर, पक्षप्रतोद निशांत पाटील व मुख्याधिकारी शंकर गोरे व सातारा विकास आघाडीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सोनगाव येथे भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी गाठताच उदयनराजे यांची स्टाईल काय असते हे नेहमीच्या सिग्नेचर स्टाईलने सांगत पुन्हा एकदा स्टाईल इज स्टाईल म्हणत आपल्या निळ्या शर्टची कॉलर उडवून दाखविली . प्रदूषणमुकत सातारा करण्यासाठी केलेले प्रयत्न सांगताना उदयनराजे यांनी पुण्यातील उरुळी देवाची येथील कचरा डेपोचा संदर्भ दिला. तसे प्रदूषण सोनगावकरांच्या वाटयाला येऊ नये यासाठी घनकचरा निर्मूलन प्रकल्प अस्तित्वात येत आहे. येथील पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी कचरा डंप होणे ही प्रक्रिया टाळली जाणार आहे. गेल्या दोन वर्षात सातारा विकास आघाडीने जाहीरनाम्यात जी कामे सांगितली ती पूर्ण केली आहेत . काही लोक नुसतचं बोलून टीका करतात मात्र मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही कारण विकासकामे करून दाखवणे ही माझी स्टाईल आहे असे उदयनराजे यांनी ठामपणे सांगितले.

सातारा शहरात आमदारांच्या नरेंद्र पाटील यांच्या सोबत झालेल्या मिसळ डिप्लोमसीची जोरदार राजकीय चर्चा झाली. मात्र या मिसळ चर्चेला उदयनराजे यांनी शनिवारी अजिबातच गृहित धरले नाही. कोणत्याही टीकेकडे मी लक्ष देत नाही असे सांगणारे उदयनराजे फारच कॅज्युअल वाटले. तीन विकास कामांचे नारळ फोडताना त्यांनी ग्रेड सेपरेटरच्या कामाचाही आढावा घेतला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.