सहापदरीकरणाच्या कामात अन्याय होऊ देणार नाही

खा. उदयनराजे; खोडशी-शिवडीअखेर रस्ता रुंदीकरणास विरोध न करण्याचे आवाहन

सातारा – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे खोडशी ते शिवडी (ता. कराड) अखेर सहापदरी रस्ता रुंदीकरणाच्या कामास येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. 2004 च्या भूसंपादनाची रक्‍कम अद्याप त्यांना अदा करण्याची आहे. त्यामुळे या कामी शेतकऱ्यांवर अन्याय न होता, सहापदरीकरणाचे भूसंपादन केले जाईल.

भूसंपादनाच्या मोजणीस ग्रामस्थांनी विरोध करु नये, मोजणी झाल्यावर खरच एखाद्यावर अन्याय होत असेल किंवा ज्यांचे विविध कारणांकरीता दोन-दोन वेळा भूसंपादन झाले असेल, अशा प्रकरणाची विशेष दखल घेऊन पर्याय काढला जाईल.

याकामी अधिवेशन समाप्त झाल्यावर लवकरच प्रत्यक्ष जागेवर जाऊन भूसंपादन अधिकरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ग्रामस्थ यांची संयुक्‍त बैठक घेऊन योग्य तोडगा काढला जाईल. कोणावर अन्याय होत असेल तर तो आम्हीसुध्दा खपवून घेणार नाही, असे परखड मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्‍त केले. सहापदरीकरणाच्या कामाच्या मोजणीस कोणी विरोध करु नय, असे आवाहन त्यांनी केले.

खोडशी ते शिवडी या भागातील शेतकरी- ग्रामस्थ यांची सहापदरीकरण कामाबाबत आयोजित विश्रामधामातील बैठकीत उदयनराजे भोसले बोलत होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रोकडे, विशेष भूसंपादन अधिकारी रेखा सोळंकी आणि ग्रामस्थ रवींद्र घाडगे, राजेंद्र करांडे, लक्ष्मण कांबळे, भास्करराव पवार, भिकाजी जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. सहापदरीकरणास भूसंपादन करण्यास असलेल्या विरोधाची कारणे उदयराजे भोसले यांच्यासमोर मांडण्यात आली.

2004 मध्ये झालेल्या भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. आमच्याच जमिनी दोन- दोन, तीन- तीनवेळा संपादित केल्या गेल्या आहेत. आता संपादन होणाऱ्या जमिनी बागायती व सुपीक आहेत. तसेच भूसंपादन एकाच बाजूला होणार आहे, हा फार मोठा अन्याय आह,े असे ग्रामस्थांनी सांगितले. महामार्गाचे आराखडे केंद्रीय स्तरावरुन मंजूर असल्याने त्यात जिल्हा पातळीवर भूसंपादन अधिकाऱ्यांना बदल करता येणार नाही, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

“”महामार्गाच्या मंजूर आराखड्यात बदल करता येईल का, तयार करण्यात आलेला आराखडा सदोष आहे का, मागील भूसंपादनाची रक्‍कम अद्याप का प्रदान केली नाही, याची माहिती प्रशासनाने द्यावी, याबाबत गरज पडल्यास आराखडा बदलला जाईल. परंतु, कोणत्याही शेतकऱ्यावर भूसंपादन होताना अन्याय केला जाणार नाही. विकासाची कामे झाली पाहिजेत या हेतूने मोजणी करण्याकरीता कोणीही आडकाठी करु नये.

संसदेचे अधिवेशन संपल्यावर प्रत्यक्ष जागेवर जाऊन राष्ट्रीय प्राधिकरण, ग्रामस्थ व भूसंपादन अधिकारी यांची संयुक्‍त बैठक घेऊन जरुर तो तोडगा काढण्यात येईल,” असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक ऍड. डी. जी. बनकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, युवा नेते संग्राम बर्गे, जितेंद्र खानविलकर, सुभाष भोसले, संदीप अहिरे आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)