ग्रेड सेपरेटरच्या कामाची उदयनराजेंकडून पाहणी

78 कोटींचा प्रकल्प दर्जेदार होत असल्याबद्दल व्यक्‍त केले समाधान
सातारा (प्रतिनिधी) –
पोवई नाक्‍यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी पाहणी केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निकाली निघणार आहे. 78 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम दर्जेदार होत असल्याचे समाधान आहे. येत्या नोव्हेंबरअखेर सातारकरांसाठी ग्रेड सेपरेटर खुला होईल, असे ते म्हणाले.

यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, श्रीकांत आंबेकर, मनोज शेंडे, सुनील काटकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, टी अँड टी या ठेकेदार कंपनीचे अभियंता शिवनाथ थोरवे, प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख उपस्थित होते. सातारा विकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पचे काम अंतिम टप्प्यात आहे. शाहू चौक ते प्रांत कार्यालय, शाहू चौक ते पंचायत समिती प्रवेशद्वार या मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. शाहू चौक ते पेंढारकर हॉस्पिटल या भुयारी मार्गिकेचे वीस टक्के काम बाकी आहे. उदयनराजे यांनी तिन्ही मार्गिकांमधून फिरून कामाची पाहणी केली. राजभोज यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. ग्रेड सेपरेटरच्या भिंतींवर निसर्गचित्रे रंगवून सुशोभित करण्यात आल्या आहेत. त्याचे उदयनराजेंनी कौतुक केले.

उदयनराजे म्हणाले, ग्रेड सेपरेटरचे काम दर्जेदार झाले असून यामध्ये बांधकाम विभाग, टी अँड टी कंपनीचे प्रकल्प संचालक व सातारकरांचा मोठा वाटा आहे. हे काम सुरू झाले, तेव्हा अनेकांनी नाके मुरडली होती; पण सातारा विकास आघाडीने आपले वचन पूर्ण केले आहे. भुयारी गटार, कास धरणाची उंची वाढविण्याचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण केले जाईल. आम्ही ग्रेड सेपरेटरचे काम मार्गी लावले. पालिकेचे पुढील सत्ताधारी या प्रकल्पाची देखभाल करतील.

छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
ग्रेड सेपरेटरनंतर पोवई नाक्‍यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल. हा भव्य पुतळा अगदी लिंब खिंडीतूनही दिसेल. त्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाणार असल्याचे उदयनराजेंनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.