उदयनराजे लवकरच कर्जतला

राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत -जामखेड विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे प्रा. राम शिंदे असा संघर्ष होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यावर पवार यांना शह देण्यासाठी नुकतेच भाजपमध्ये आलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना कर्जतला बोलविण्यात आले असून दि.3 किंवा 4 ऑक्‍टोबर रोजी प्रा. शिंदे अर्ज दाखल करताना उदयनराजे हे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

प्रा. राम शिंदे यांना भाजपची उमेदवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना आखाड्यात उतरवण्यात आले आहे.

या मतदारसंघाला शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रिपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करत शिंदे यांनी दोन्ही तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. दुसरीकडे शिंदेंसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक रोहित पवार रिंगणात उतरत असल्यामुळे अटातटीची ठरण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

पवारांना शह देण्यासाठी प्रा. राम शिंदे यांनी वेगळी खेळी खेळत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले, युवकांच्या गळ्यातील ताईत असलेले माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी अर्ज दाखल करताना आणण्याचे ठरविले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.